

नागपूर शहरात डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर पूर्ण बंदी घालण्यात आली.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली.
ही बंदी 3 सप्टेंबर मध्यरात्रीपासून 1 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
पराग ढोबळे, साम प्रतिनिधी
आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. एकीकडे पुण्यात डीजे बंदीवरून गोंधळ सुरू असताना नागपुरात मात्र त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटाला आळा बसणार आहे. डीजे (DJ) आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केलीय. ही बंदी 3 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजेपासून ते 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. यामुळे आगामी सणांमध्ये डीजेच्या दणदणाटाला आळा बसणार आहे.
अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, सण-उत्सवांच्या काळात टॉप, मिड आणि बेस, अशी मल्टीस्पीकर सिस्टीम, प्लाझ्मा साऊंड सिस्टीम आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टीमचे एकावर एक थरावर थर चढवून वाहनांवर एखाद्या भिंतीसारखी रचना उभारली जाते. यासाठी वाहनांच्या मूळ रचनेत बेकायदेशीर बदल केले जातात. अशाप्रकारच्या डीजेचा थरांवर थर लावून साऊंड सिस्टीम वापरले जातात, त्यावरही बंदी घालण्यात आलीय.
बहुतेकवेळा डीजेच्या आवाजामुळे वाद होत असतात. मंडळाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. तसेच यामुळे ध्वनी मर्यादेचे तीव्र उल्लंघन होते आणि कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे असे मल्टी-लेयर साऊंड सिस्टीम वापरण्यासाठी आणलेली वाहने किंवा रचनेत बदल केलेली वाहने कुठे आढळतील, त्यांच्यावर ऑन स्पॉट कारवाई करत सीलबंद केले जातील.
नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या या आदेशामुळे यंदा मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापरावर निर्बंध असणार आहेत. मात्र, प्रशासनाने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की, ही कडक बंदी केवळ अवाजवी आणि नियमबाह्य डॉल्बी सिस्टीमवर आहे. शासनाने आखून दिलेल्या अधिकृत ध्वनी मर्यादेचे तंतोतंत पालन करणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला ही अधिसूचना लागू नसेल.
विधानपरिषदेचे माजी आमदार, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी नागपुरात डीजे बंदीसाठी पुढाकार घेतलाय. विविध सण आणि उत्सवांमध्ये होणारा डीजेचे भयानक आवाज, तसंच घातक लेझर लाईटमुळे लोकांच्या कानावर आणि डोळ्यावर अत्यंत विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे कोणत्याही धर्माचा सण उत्सव असेल तरी डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर पूर्ण बंदी घातली पाहिजे अशी मागणी संदीप जोशी यांनी केलीय.
नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदीचा घेतलेला निर्णय हा आमच्या चळवळीचा अंशतः विजय आहे. डीजे पासून कायम मुक्ती यासाठी इथून पुढे अजूनही काम करणार आहे. गृह विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या आम्ही स्वागत करतो. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशामध्ये फक्त मिरवणुकीमध्ये डीजे वापरण्यावर बंदी असल्याचा उल्लेख आहे उद्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन स्थिर किंवा मिरवणूक कुठेही वापरायला बंदी असावी ही मागणी करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.