

२९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली
१५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी
बृहन्मुंबई महानगरपालिकेसह एकूण २,८६९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार
बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
येथील सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महानगरपालिका आहेत. 5 महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये संपली आहे. सर्वाधिक 18 महानगरपालिकांची मुदत 2022 मध्ये संपली होती; तर 4 महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपली आहे. मुदत समाप्तीची महानगरपालिकानिहाय तारीख अशी: छत्रपती संभाजीनगर: 27 एप्रिल 2020, नवी मुंबई: 07 मे 2020, वसई- विरार: 28 जून 2020, कल्याण- डोंबिवली: 10 नोव्हेंबर 2020, कोल्हापूर: 15 नोव्हेंबर 2020, नागपूर: 04 मार्च 2022, बृहन्मुंबई: 07 मार्च 2022, सोलापूर: 07 मार्च 2022, अमरावती: 08 मार्च 2022, अकोला: 08 मार्च 2022, नाशिक: 13 मार्च 2022, पिंपरी- चिंचवड: 13 मार्च 2022, पुणे: 14 मार्च 2022, उल्हासनगर: 04 एप्रिल 2022, ठाणे: 05 एप्रिल 2022, चंद्रपूर: 29 एप्रिल 2022, परभणी: 15 मे 2022, लातूर: 21 मे 2022, भिवंडी- निजामपूर: 08 जून 2022, मालेगाव: 13 जून 2022, पनवेल: 9 जुलै 2022, मीरा- भाईंदर: 27 ऑगस्ट 2022, नांदेड- वाघाळा: 31 ऑक्टोबर 2022, सांगली- मीरज- कुपवाड: 19 ऑगस्ट 2023, जळगाव: 17 सप्टेंबर 2023, अहिल्यानगर: 27 डिसेंबर 2023, धुळे: 30 डिसेंबर 2023, जालना: नवनिर्मित आणि इचलकरंजी: नवनिर्मित
बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. “सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल,” असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.
महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही; परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.