विनायक वंजारे, साम टीव्ही
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका कारचा भीषण आपघात झाला. या अपघातात कारमधील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा हा थरार महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दीव-दमण येथून पर्यटनासाठी गोव्याच्या दिशेने जात असताना इन्सुली येथे चालकाला महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. यामुळे सुसाट कार अचानक खड्ड्यात आदळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. टक्कर इतकी भयंकर होती की, कारमधील एक महिला प्रवासी तब्बल २० फूट उंच उडून थेट रस्त्यावर फेकली गेली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. इतर तिघांवर सध्या गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हा निष्पाप बळी गेल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. याआधीही या ठिकाणाहून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे. तरी देखील हे निर्दयी सरकार रस्त्याचे काम करत नाहीये अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.