Jalgaon News: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अनेक जण लायकी नसतानाही मुख्यमंत्री होतात', असा घणाघात त्यांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे.
जळगावच्या पाचोऱ्यामध्ये रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने संजय राऊत हे जळगावमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंवर टीका केली.
जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. अजितदादा पवारांचे पुण्यात मुख्यमंत्रीपदाचे बॅनर झळकले यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. 'मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पण अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड आणि तोडफोड करुन मुख्यमंत्री होत असतात.', अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
अजितदादा पवार यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, 'अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षे राजकारणात आहेत. अनेक वर्षे मंत्री आहेत. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. एखाद्याच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील. अजितदादांना माझ्या शुभेच्छा.'
दरम्यान, राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये जाणार असल्याच्या तुफान चर्चा सुरु होत्या. पण या सर्व चर्चांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत.
यामागचे कारण म्हणजे पुण्यातील कोथरूड परिसरात अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स झळकले आहेत. पुण्यातील हे बॅनर्स पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता पुन्हा एकदा अजितदादांवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.