संजय जाधव
मोठ्या कष्ठाने शेती पीकवणाऱ्या शेतकऱ्याची ठिकठिकाणी घोर फसवणूक होताना दिसत आहे. वरदडी या गावातील नारायण नागरे यांच्यासोबत देखील अशीच फसवणूक होणार होती. मात्र वेळीच त्यांच्या लक्षात आल्याने ते सावध झाले.
नागरे यांनी आपला कापूस विकायला काढला होता. त्यांच्या गावात एक व्यापारी आला तो बाजार भावापेक्षा एक रुपया भाव जास्त देत होता. त्यामुळे नागरे यांनी 25 क्विंटल कापूस त्या व्यापाऱ्याला विकण्याचं ठरवलं. कापूस विकत असताना व्यापाऱ्याने चलाखीने कापसाचे वजन कमी भरत असल्याचे सांगितले.
वजन काट्यात कापूस मोजताना व्यपाऱ्याने वजनकाट्याला एक यंत्र लावले होते. कापूस त्यात टाकल्यावर त्याच्या खिशातील छोटंसं रिमोटचं बटण तो दाबायचा. लागलीच त्या कापसाचे वजन कमी होत होते. शेतकरी नारायण नागरे यांनी त्या व्यापाऱ्याला पकडले व त्याच्या खिशातील रिमोट ताब्यात घेतला तेव्हा कळले की, एका गाठोड्या मागे तो 6 ते 7 किलो कापूस जास्त घेत आहे.
गावकऱ्यांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने स्वत: याचे प्रात्यक्षित करून दाखवले. त्या व्यापाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून यापुढे इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यामार्फत कापूस देताना लक्ष द्यावे किंवा साध्या वजनकाट्याच्या माध्यमातून कापूस विकावा असे आवाहन नारायण नागरे यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.
ग्रामीण भागात आज ना उद्या भाव वाढेल यासाठी शेतकरी बाजार समितीच्या मार्केट यार्डात होणाऱ्या लिलावाकडे आस लावून बसला आहे. मात्र, दिवसेंदिवस भाववाढ होण्याऐवजी दर कमी होत असल्याने कापूस उत्पादकांची पुरती निराशा झाली आहे. अपेक्षित भाववाढीने शेतकऱ्यांचा घात केला असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात साठवलेले पांढरे सोने काळवंडत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली तेव्हा कापसाचे दर हे 12 हजार रुपये प्रतिक्विंटल होते. परिणामी महागड्या औषधांची फवारणी करत कापूस जोपासला. मात्र, सुरुवातीला मिळणारा प्रतिक्विंटलचा भाव आज ८ हजार रुपयांवर आला. त्यामुळे कापूस उत्पादकांमध्ये धाकधूक वाढली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.