

महापालिका निवडणुकीचा निकाल लागूनही महापौर निवड रखडलेली
नाशिक, धुळे, चंद्रपूर आदी ठिकाणी लवकर निर्णयाची शक्यता
मुंबई आणि पुण्यात गट स्थापन न झाल्याने विलंब
मुंबईसह राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस उलटलेत. महापालिकांमधील महापौरचा निवडीचा विषय अजून मार्गी लागला नाह. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नाशिक, धुळे,चंद्रपूर आणि अहिल्यानगर आदी महापालिकेतील महापौर निवडीचा निर्णय लागेल. मात्र मुंबई आणि पुण्यात कोण महपौर होणार याबबात कोणतीच माहिती समोर आली नाहीये.
दुसरीकडे मुंबई-पुणे सोडता राज्यातील चंद्रपूर, नाशिकसह धुळे,जळगाव आणि अहिल्यानगर महापालिकेतील महापौरची निवड फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होईल. पण राज्यातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईतील महापौरपदाबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये. महापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती असलेल्या मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या गटाची स्थापना अजून झाली नाहीये. त्यामुळे येथील महापौर पदाची निवड लांबणी पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. गट स्थापन झाल्यानंतर महापौर पदाच्या निवडीबाबतची तारीख ठरेल. मुंबई,पुण्यासह छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण हे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच कळेल असं सध्या तरी चित्र आहे. येत्या पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. त्यानंतर त्याची सात फेब्रुवारी मतमोजणी असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही त्यानंतरच होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नगरसेवकांची नावे ही राजपत्रात आली.
त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्तांना एक पत्र पाठवण्यात आलेले आहे. त्या पत्रामध्ये महानगरपालिकेकडून निवडणूक आणि निकालाची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे, त्यानंतर आता महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकी संदर्भात आपण पुढची प्रक्रिया पार पाडण्यासंदर्भात आदेशित करावे अशी त्या पत्रात सांगण्यात आलेले आहे.
मात्र अद्यापपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयकडून कोणतीही सूचना महानगरपालिका प्रशासनाला मिळाली नाही. महापौर आणि महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असतात, सध्या जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतरच होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरीता १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी, या निवडणुकीच्या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती केली आहे. सकाळी ११ वाजता मनपातील राणी हिराई सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवनिर्वाचित सदस्यांमधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी गुरुवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया नाशिक, धुळे, जळगावसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये एकाच दिवशी पार पडणार आहे. या विशेष सभेसाठी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पीठासीन अधिकारी यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करून सभेचे कामकाज पार पाडावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच, या बैठकीचे सविस्तर इतिवृत्त महानगरपालिकेच्या अधिकृत इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापौर व उपमहापौर निवडीकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले असून, या सभेत कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
६ फेब्रुवारीला नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे ६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा होईल. दुसरीकडे तर ७ फेब्रुवारीला मालेगाव महापालिका महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा पार पडणार आहे.
मुंबईचा नवा महापौर कोण होणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. येत्या ३१ जानेवारी २०२६ रोजी होणारी महापौर पदाची निवडणूक आता फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांची म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची अद्याप विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट नोंदणी झालेली नाहीये. त्यामुळे हा विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिका निवडणुकीनंतर गट नोंदणीचा पेच कायम आहे. महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत पक्षादेश (व्हीप) लागू करता येत नाही.
पुणे महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. महापौरपदाचं आरक्षणही जाहीर झाले असून संभाव्य नावं समोर आली आहेत. परंतु महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.