मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. अंतरवली सराटी येथे ते उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं आणि सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी ते उपोषण करत आहेत.
मात्र दुसरीकडे त्यांचे मोठे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक निवेदन दिले. या निवेदनामध्ये त्यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत काही शेतकरी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना भावाने देखील उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांचे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे हे बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरीमध्ये राहतात. मनोज जरांगे पाटल गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील पुन्हा आपण उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र आता त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब जरांगे यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी त्यांनी जर मागणी लवकरात लवकर जर मान्य नाही केली तर आपण शेतकऱ्यांना घेऊन उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.