छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण तब्बल 97.30 टक्के भरलं आहे. त्यामुळे आज सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 0.5 फुटाने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या जायकवाडी धरणातून गोदापात्रात 3144 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती पाठबंधारे विभागाने दिली आहे. यंदा नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी जुलै महिन्यात अवघ्या 6 टक्क्यांवर असलेलं जायकवाडी धरण (Jayakwadi Water Dam) सोमवारी सप्टेंबर महिन्यात 90 टक्क्यांहून अधिक भरलं.
सोमवारी सकाळी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 98 टक्के इतका झाला होता. धरणात 15 हजार 141 क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते. त्याचबरोबर कोणत्याही क्षणी गोदापात्रात (Godavari River) पाणी सोडले जाईल, असं पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. यापार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता.
आज सोमवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सध्या धरणाचे 6 दरवाजे 0.5 फुटाने उघडण्यात आले आहे. परिणामी गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. सध्या धरणातून 3144 क्युसेस इतक्या वेगाने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, पावसाळ्याचा हंगाम अजूनही 1 महिना शिल्लक असून मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली तर गोदावरी नदीत आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असं पाठबंधारे विभागाने स्पष्ट केलं आहे. तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.