अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
Manoj Jarange Patil latest news : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत सुरू असलेले आमरण उपोषण आज सातव्या दिवशीही कायम आहे. गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. पण या भेटीनंतरही जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. "सरकारला खूप वेळ दिला, आता अधिक वेळ देऊ शकत नाही; आम्हाला केवळ आश्वासने नको, तर थेट कृती हवी," अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
११ सप्टेंबरपर्यंतची मुदत; मुंबई आंदोलनाचा इशारा
सरकारला इशारा देताना जरांगे पाटील म्हणाले की, ११ सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. अन्यथा १२ सप्टेंबर रोजी मराठा समाजाची बैठक घेऊन मुंबईतील आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. "सरकारला तीन वर्षे वेळ दिला आहे. आता यापेक्षा जास्त वेळ देणे शक्य नाही. हैदराबाद गॅझेटिअर, ५८ लाख कुणबी नोंदी आणि सातारा-कोल्हापूरसह औंध गॅझेटिअर लागू करण्याच्या मुद्द्यांवर आम्ही ठाम आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.
'दोन-तीन दिवसांत सलाईन आणि पाणीही बंद करणार'
सध्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे सुरू असलेल्या उपचारांवर बोलताना ते म्हणाले, "दोन-चार सलाईन लावल्यामुळे मला आज बोलता येत आहे. सरकारने विनंती केली म्हणून मी सलाईन लावून घेतली आहे. मात्र, मी आणखी दोन ते तीन दिवस वाट पाहीन. त्यानंतर सलाईन काढून टाकेन आणि पाणी तसेच इतर सर्व उपचार पूर्णपणे बंद करेन."
केवळ कागदी व्यवस्थेने प्रश्न सुटणार नाहीत
जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या विशेष शिबिरांवर आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले. "मराठा कक्ष स्थापन केला, नोडल अधिकारी नियुक्त केले हे मान्य; पण हे अधिकारी पूर्णवेळ काम करून गोरगरिबांच्या समस्यांवर प्रत्यक्ष तोडगा काढणार का? केवळ कागदावर व्यवस्था निर्माण करून माझ्या समाजातील मुलांचे कल्याण होणार नाही," अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
तसेच ५८ लाख नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही, असा पुनरुच्चारही जरांगे पाटील यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.