अजय सोनवणे, साम टीव्ही
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये तब्बल 15 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मोबाइल फोनची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून पुण्याच्या दिशेने रेडमी कंपनीचे मोबाइल घेऊन जाणारा आयशर ट्रक मालेगाव परिसरात चोरीला गेला. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या 24 तासात ट्रक चालकासह दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी मोबाइलचे बॉक्स आणि आयशर ट्रक असा एकूण 15 कोटी 33 लाख 20 हजार 866 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी दिली.
मिळालेल्या महितीनुसार, दिल्ली येथून पुणे येथे रेडमी कंपनीचे मोबाइल फोन घेऊन एक आयशर ट्रक निघाला होता. हा ट्रक मनमाड-मालेगाव रस्त्यावरील वऱ्हाणे शिवरातील पेट्रोलपंपाजवळ आला असताना मोबाइल चोरीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. ट्रक चालक यासीर हकमुद्दिन याने घोडेगाव येथे राहणाऱ्या इरफान आसमोहम्मद खान याच्या मदतीने ट्रकमधील मोबाइलचे बॉक्स वाहनात भरल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मोबाइलचा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी संशयितांच्या हालचालींचा माग काढला. या तपासातून मोबाइलचे बॉक्स दुसऱ्या वाहनात भरून नेण्यात आल्याचे उघड झाले.
पोलिसांच्या तपासानुसार, ट्रक चालक आणि इरफान आसमोहम्मद खान यांनी मोबाइलचे बॉक्स दुसऱ्या वाहनात भरून घोडेगावजवळील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत मोबाइलचे बॉक्स आणि आयशर ट्रक जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 15 कोटी 33 लाख 29 हजार 866 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी ट्रक चालक यासीर हकमुद्दीन आणि इरफान आसमोहम्मद खान या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीच्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.