मराठवाडा व विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली, अनेक ठिकाणी पूरस्थिती
जालना, नांदेड, धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत वाहतूक ठप्प
शेतजमिनी पाण्याखाली; पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता
प्रशासन सतर्क, मदतकार्य सुरू; ग्रामस्थांची कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गेल्या चोवीस तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी हवामान खात्याने हलक्या स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली मध्ये पावसाने हैदोस घातला आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर असा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जालन्याच्या परतूर तालुक्यातील श्रीष्टी परिसरात काल मध्यरात्रीपासून संततधार कोसळत आहे. अचानक झालेल्या पावसामुळे परिसरातून वाहणाऱ्या कसूरा नदीला पूर आला असून नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी परतूर-आष्टी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरिपाच्या सोयाबीन, कापूस आणि मूग यांसारख्या पिकांना पाण्याचा फटका बसू शकतो, अशी भीती शेतकऱ्यांत आहे.
नांदेड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. कंधार तालुक्यातील तैलूर-कौठा नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत आहे आणि हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिन असल्याने अनेक गावांतील विद्यार्थ्यांना झेंडावंदन सोहळ्याला जाता आले नाही. स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वीच पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, हदगाव तालुक्यातील तामसा गावात मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, गोरगरीब कुटुंबांचे घरगुती साहित्य व धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले असून, नुकसानभरपाईची मागणी जोर धरत आहे.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मुंबर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही पाणी वाहू लागल्याने संपर्क तुटला आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या उघडीनंतर पुन्हा पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. वसमत तालुक्यासह इतर भागांत जोरदार पाऊस कोसळला असून, पिकांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरली नसल्याने शेतकरी व नागरिकांना अजूनही अधिक पावसाची वाट पाहावी लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच इतका मोठा पाऊस झाला आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील काही भागांत पाणी साचून रस्त्यांची स्थिती नदीसारखी झाली आहे. काही ठिकाणी वाहने पाण्यात अडकली असून, वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिघडली आहे. परंडा तालुक्यातील सिरसाव गावातील चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे गावातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पंधरा वर्षांत असा पूर कधीही आला नव्हता. तसेच मांजरा नदीची उपनदी असलेल्या वाशीरा नदीला मोठा पूर आल्याने वाशी तालुक्यातील उंच पुलावरून पाणी वाहत आहे. कळंब-इटकुर-पारा मार्ग बंद झाला असून, अनेकांचे शेतातील गोठे व घरे पाण्याखाली गेली आहेत. भुम तालुक्यातील आरसोली प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून, रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे.
हवामान खात्याने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत देखील आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती, रस्ते, पूल आणि घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली असून, पूरग्रस्त भागांत मदतकार्य सुरू केले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा आपत्तींसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.