राज्यामध्ये मान्सूनने (Monsoon) आज हजेरी लावली. मान्सून दाखल झाल्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना प्रचंड आनंद झाला आहे. सध्या मान्सून तळ कोकणात दाखल झाला असून हळूहळू तो पुढे सरकत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. अशामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस (Pre Monsoon Rainfall) पडत आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला आहे. राज्यात आज पावसाची नेमकी काय परिस्थिती होती हे आपण जाणून घेणार आहोत...
वाशिम शहरासह जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. हवामान खात्याचा मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज खरा ठरला असून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
अकोला जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अकोलेकरांना काहिसा दिलासा मिळाला. पण जोराच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी पत्रे उडून गेलेत. अकोट शहरातल्या एका जिनिंगचे टिन पत्रे उडाले. या नुकसानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिनिंगचे एक ते दीड कोटी रुपायांचे नुकसान झाल्याचे सांगितले जातेय. अकोला शहरातल्या जठारपेठ भागात पावसासह गारपिट झालीय.
नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. नाशिकरोड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. संध्याकाळच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्यात. तर दुसरीकडे नाशिकरोड परिसरात रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाहनं चालवताना वाहन चालकांची तारेवरची कसरत पहायला मिळाली.
हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात येत्या शनिवारपासून ४ दिवस मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र दोन दिवस आधीच यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात जोरदार वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या परिस्थितीत मान्सूनची आगेकूच सुरू असताना जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याआधीच मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान आज दुपारपासून जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाला सुरूवात झाली आहे. तर गेल्या 2 तासांपासून जिल्ह्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरूवात केली आहे.
पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. शहरातील प्रमुख भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुण्यातील शनिवार, नारायण पेठेत जोरदार पाऊस पडत आहे. वानवडीतील फातिमानगरमध्ये झाड पडून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. २ कार आणि १० ते १२ दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून एक दुचाकी चालकाच्या अंगावर झाड पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या काही भागांमध्ये आज दुपारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर पेरणीसाठी लवकर पाऊस पडेल अशी आशा निर्माण झालीय.
धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे एकीकडे उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. धाराशिवसह, तुळजापूर, कळंब, वाशी तालुक्यात पाऊस झाला असून त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने यंदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याचीच जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.