परभणीत अवकाळी पावसाचा हैदोस
घराची भिंत कोसळून ११ वर्षीय दिपाली नंदगे हिचा मृत्यू
गंगाखेड तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याची गाय आणि बैल दगावले
रेल्वे स्थानकावरील पत्र्याचे शेड उडून ओव्हरहेड वायरवर पडले
अहिल्यानगरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Parbhani Indewadi Rain Havoc Tragedy परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठे नुकसान झाले आहे. परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथे घराची भिंत कोसळून ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा बैल आणि गाय दगावली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर पोखरणी रेल्वे स्थानकावर वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड उडून थेट ओव्हरहेड वायरवर पडल्याची घटना घडली. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून मोठी दुर्घटना टळली आहे.
परभणी तालुक्यातील इंदेवाडी (Parbhani Indewadi) येथे काल वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्यानंतर विटांची भिंत कोसळली. या दुर्घटनेत दिपाली विजय नंदगे (वय ११) हिच्या डोक्यावर भिंत पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली असून परिसरात शोककळा पसरली आहे. दुसरीकडे, गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसादरम्यान शेत परिसरात वीज कोसळली. या घटनेत शेतकरी किरण कराळे यांचा एक बैल आणि एक गाय जागीच दगावले. शेतीकामासाठी उपयुक्त असलेली जनावरे गमावल्याने कराळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, पोखरणी रेल्वे स्थानकावर (Pokharni Railway Station) वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे पूर्ण शेड उडून थेट ओव्हरहेड वायरवर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ क्रेनच्या सहाय्याने शेड हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच रेल्वे वाहतुकीवरही या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधितांना मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Ahilyanagar Rashin Amit Sukal Dies After Hording Collapse अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे अनधिकृत लोखंडी होर्डिंग कोसळून २४ वर्षीय अमित मोहन सुकाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसादरम्यान महात्मा फुले चौकातील होर्डिंगवर लावलेल्या बॅनरला छिद्रे पाडण्याचे काम सुरू होते. बॅनर फाटू नये म्हणून अमित यांना होर्डिंगवर चढण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने संपूर्ण होर्डिंग कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी विकास लहू सायकर यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.