Maharashtra Weather News: राज्यात अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावत मोठे नुकसान केले आहे. सांगली, सातारा, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, घरांचे नुकसान आणि जीवितहानीच्या घटना समोर आल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे द्राक्ष बागांवरील शेड, घरांची पत्रे उडून मोठे नुकसान झाले. खलाटी येथे आनंदा बिरु शेजुळ यांच्या घरावरील पत्रे उडाल्यानंतर घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत अवघ्या आठ महिन्यांच्या श्रीवर्धन शेजुळ या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मान्सूनपूर्व पावसादरम्यान सातारा जिल्ह्यातील बामणोलीजवळील शिवसागर जलाशयात एक बोट दुर्घटना घडली. दोन पर्यटकांना घेऊन जाणारी बोट वादळी वाऱ्यामुळे बुडाली. सुदैवाने दोन्ही पर्यटकांनी पोहत किनारा गाठत आपला जीव वाचवला. मात्र बोटीचा चालक रुपेश धोंडीबा तांबे हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सावरी येथील नवीन पुलाजवळ ही घटना घडली. शिवसागर बोट क्लबच्या सदस्यांकडून सकाळपासून शोधमोहीम राबवली जात असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यालाही वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. अनेक घरांची छते उडाली तर कोहमारा-नवेगावबांध मार्गावर मोठमोठी झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. धान आणि मका पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
तर, नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याचा अंदाज फोल ठरवत मान्सूनपूर्व पावसाने अचानक हजेरी लावली. 15 मेपर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र सकाळच्या सुमारास नांदेड शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी ढगाळ वातावरण कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.