राज्यात उकाडा कमी, पण दमट हवामान कायम
मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा
गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पुढील 2-3 दिवस हवामान अस्थिर राहणार
राज्यात सध्या उकाडा कमी होत असून दमट हवामान पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान उष्णतेने हैराण झालेल्या राज्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवस महत्त्वाचे असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजा, वादळी वारे आणि गारपीटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत आज तुरळक ठिकाणी गारपीटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मध्य महाराष्ट्रातही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि गारपीटीचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकणात मात्र उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रामुख्याने उकाडा जाणवणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात दमट वातावरण अधिक जाणवणार आहे.
विदर्भातही हवामानाचा बदल जाणवणार असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर वादळी पावसाचा धोका कायम राहणार असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. भंडारा, तुमसर, मोहाडीसह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. सध्या भातपीक कापणीला आलेल असताना या वादळीवाऱ्यासह मागील दोन दिवसांपासून भातपीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतोय. आज पुन्हा तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं कापणीला आलेला भातपीक जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यासोबतच मका आणि आंबा बागायतदारही शेतकऱ्यांना या अवकाळी वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.