

शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला.
महामार्गाची लांबी ८५६ किमीपर्यंत वाढली.
सातारा आणि चंदगड परिसराचा नव्या मार्गात समावेश.
राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आणि वादात राहिलेला शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा एकदा बदलण्यात आला आहे. नव्या आराखड्यानुसार आता या महामार्गाची लांबी वाढली आहे. आधी या महामार्गाची लांबी आधी ८०२ किमी एवढी होती. मात्र, आता मार्गात बदल केल्याने त्याची लांबी ५४ किमीने वाढून ८५६ किमीपर्यंत गेली आहे.
सुधारित मार्गात सातारा जिल्ह्यासह चंदगड परिसराचा समावेश केला आहे. मात्र त्यानंतर या महामार्गाला आधी विरोध करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता पुन्हा निवेदने देऊन महामार्ग आमच्या भागातून न्या, अशी मागणी केली आहे. त्यानंतर शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित मार्ग आराखडा जाहीर करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
शक्तिपीठ महामार्गाबाबत माहिती देताना गायकवाड म्हणाले, चंदगड हा भाग महाबळेश्वरप्रमाणे थंड प्रदेश आहे. त्यातून या भागात पर्यटनाला आता मोठी चालना मिळेल. याआधी सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातील लोकांचा महामार्गाला विरोध होता. त्यामुळे त्या भागातील मार्ग बदलण्यात आला, असेही गायकवाड यांनी म्हटले.
नांदेडमध्ये विरोधामुळे जवळपास १०० किमी लांबीचा मार्ग बदलण्यात आलाय. शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित मार्गाची अधिसूचना काढण्यात आली आहे. भूसंपादनासाठी १२/२ ची अधिसूचना लवकरच निघेल. त्यानंतर बदललेल्या मार्गातील गावांची संयुक्त मोजणी सुरू होईल. या भागातील भूसंपादनासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला दिला जाईल. त्यामुळे भूसंपादन मोबदल्यातही वाढ होण्याची शक्यता आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
हा महामार्ग महाराष्ट्रातील १२ ते १३ जिल्ह्यांमधून जातो. यामध्ये प्रामुख्याने वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या महामार्गामुळे साडेतीन शक्तीपीठे (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर), तीन ज्योतिर्लिंगे आणि १८ तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाची वेळ तब्बल १८-२० तासांवरून थेट ८-१० तासांपर्यंत कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.