महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यात हाहाकार माजला आहे.
IMD ने अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.
दोन दिवसांत ८ जणांचा मृत्यू, जनावरांचे बळी आणि शेतीचे नुकसान झाले आहे.
रेल्वे व रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra flood situation News : महाराष्ट्रातील जनता सध्या पावसाच्या तडाख्याने हैराण आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, आणि त्याने जनजीवनाला चांगलाच फटका बसलाय. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिकपासून ते मराठवाडा आणि विदर्भापर्यंत पावसाने सर्वत्र हाहाकार माजवलाय. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी अनेक भागात रेड अलर्ट जारी केलाय, तर काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्टही जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्रात आतापर्यंत ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पाच जण वाहून गेले आहेत. आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याचे सांगण्यात आले.
"पाऊस पडतो तिथे सुख, पण जास्त पडला तर दुख!" या म्हणीसारखी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यात पावसामुळे दोन दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जनवारे वाहून गेलीत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. मुंबईची तर तुंबई झाली आहे. लोकलसेवा विस्कळीत आहे. हार्बर आणि मध्य रेल्वे ठप्प झाला आहे. रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या जोराने पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत मागील ४८ तास कोसळलेल्या पावसाने रस्ते जलमय झालेत, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगफुटीसदृश पाऊस कोसळलाय.
"पाऊस पडतो, पिकं हसतात; पण पूर येतो, तेव्हा सगळं वाहून जातं!" पावसाने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला असला, तरी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसानही झालंय. केळी, ऊस आणि कापूस यांसारख्या पिकांना मोठा फटका बसलाय. पालघरमध्ये वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडाले, तर सोलापूरमध्ये रात्रभर कोसळलेल्या पावसाने रस्ते आणि घरांमध्ये पाणी शिरलंय. नांदेडमध्येही भयान स्थित आहे. नांदेडमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील २४ तासांतही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या 24 तासात मुंबई, पुण्यासह, कोकण किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे पश्चिमेकडे त्याचा जोर अधिक आहे परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणखी 24 तास राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावर असणाऱ्या पर्यटन क्षेत्रावर जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा हवामान शास्त्रज्ञांनी केलं आहे.
पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. INCOIS तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना ३.५ ते ४.३ मीटर तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. SDRF चे १ पथक नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत २९३ नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे. IMD, NRSC या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. SACHET platform चा वापर करून हवामानाचे अलर्ट नागरिकांपर्यंत २० अलर्ट द्वारे ३४ कोटी SMS च्या माध्यमातून पोहचवण्यात आले आहेत. मुंबईत विविध २४ ठिकाणी पाणी साचले असून पाणी निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.