रायगड, पुणे आणि सातारा घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट
ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथा भागात यलो अलर्ट
राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला
अल निनोच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला असून अनेक भागांत ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली, तरी काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात जोरदार पावसाच्या सरींची शक्यता लक्षात घेऊन येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दुसरीकडे, उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसभर ऊन आणि ढगांचा खेळ सुरू राहील, तर काही ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोर लावला आहे.
आज सकाळच्या सुमारास देखील पावसाची उघडीप पाहायला मिळाली. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर काहीशा प्रमाणात कमी होणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.