शिवसेना ठाकरे गटप्रमुख उध्दव ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने नेवासा, श्रीरामपुर, राहाता, कोपरगाव, संगमनेर आणि अकोले या विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे सभा घेणार आहेत. २००९ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरेंनी लक्ष केंद्रित केले आहे. ठाकरेंसाठी शिर्डी लोकसभेची जागा का महत्वाची आहे? जाणून घ्या सविस्तर.
२००९ साली अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदारसंघावर आजतागायत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. २००९ साली शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव करत शिर्डीत शिवसेनेचा भगवा फडकवला. तेव्हापासून हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchoure) यांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उमेदवार पळवला गेल्याने शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला आणि ऐनवेळी सदाशिव लोखंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. भाऊसाहेब वाकचौरे यांनी ऐनवेळी साथ सोडल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष होता. शिवसैनिकांनी कंबर कसली आणि मुंबईहून ऐनवेळी आयात केलेल्या सदाशिव लोखंडे यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली.
भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेची (Shivsena) साथ सोडल्याची बाब मतदारांनाही आवडली नाही आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. वाकचौरे यांचा दारुण पराभव झाला आणि सदाशिव लोखंडे अवघे १३ दिवस प्रचार करून शिर्डीचे खासदार झाले. मात्र खासदार लोखंडे मतदारसंघात दिसत नसल्याने पुढील पाच वर्षे त्यांच्याबद्दल जनतेत रोष दिसून आला.
२०१९ ला लोखंडे यांना तिकीट नको अशी भूमिका अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली. मात्र उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा लोखंडे यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांनी पुन्हा जंगजंग पछाडत सदाशिव लोखंडे यांना खासदार केले. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. लोखंडे यांनी ठाकरे यांची साथ सोडली असली तरी शिर्डी लोकसभा मदारसंघांतील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजही उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहेत.
लोखंडे शिंदे गटात गेल्याने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला असून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना यांची ताकत आणखी वाढली असून शिवसैनिकांमध्येही उत्साह दिसून येत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिर्डी लोकसभा मतदासंघांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांचा दोन दिवसीय दौरा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.