सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा निवडीवर आक्षेप
सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत पाठवली नोटीस
राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी
प्रफुल पटेल यांनी निवड घटनानुसार झाल्याचा दावा
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यावेळी पुन्हा पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुनेत्रा पवार यांची झालेली निवड ही घटनेला धरून न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलैला ही नोटीस बजावली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे. ही नोटीस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रपुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना बजावण्यात आली आहे. यात २६ फेब्रुवारी २०२६ ला घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचे म्हणत ती रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करताना ती कशी करावी याबाबत देखील सच्चिदानंद यांनी सांगितले. यासाठी स्वतंत्र आणि निपक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्यांच्या मार्फत निवडणूक घेण्यात यावी. तोवर राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारीत ॲाफिस बेअररची यादी ही रद्द समजावी असे त्यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यामुळे आणि त्यांना नोटीस पाठवण्यात आल्यामुळे आता जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सर्व सूत्रे हाती घेतली. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री करण्यात आल. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील झाल्या. पण आता त्यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान मिळत आहे. त्यामुळे आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून नेमका काय निर्णय घेतला जातोय ते पाहणे महत्वाचे राहिल.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा आणि माझा काहीही संबंध नाही. सुनेत्रा पवार यांची निवड घटनेला धरूनच झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.