

उद्धव ठाकरे यांना धाराशिवमध्ये मोठा धक्का
चेतन बोराडे यांचा शिंदेसेनेत प्रवेश
धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठी गळती
शिंदेसेनेत अनेक पदाधिकारी आणि समर्थकांचा प्रवेश
धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. १० नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आता आणखी एका बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि समर्थकांसह धनुष्यबाण हाती घेतले. हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमध्ये शिंदेसेनेची ताकद वाढली.
भूम-परंडा- वाशी विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी करत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. ठाकरेसेनेचे उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे यांनी शनिवारी आपल्या पदाधिकारी आणि समर्थकांसह शिंदेसेनेत प्रवेश केला. भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पाथरूड जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाच वेळी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे भूम तालुक्यातील राजकीय समिकरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धाराशिव जिल्हा हा ठाकरेसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. असे असताना धाराशिवमध्ये ठाकरेसेनेला लागलेली गळती ही पक्षासाठी चिंतेची बाब होत चालली आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेनेची ताकद वाढत चालली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. कळंब नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्यासह सर्वच्या सर्व १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सोलापूरमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता. भाजप नेते राणा जगतीतसिंह पाटील यांनी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांना याद्वारे मोठा धक्का दिला. या पक्षप्रवेशामुळे कळंब नगरपालिकेमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.