

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पदभार स्वीकारत त्यांनी लागलीच कामाला देखील सुरुवात केली. त्यामुळे, आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कधी होणार, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. त्यात आज सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि नाव ठरलंय.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव नाव आघाडीवर होते. त्यातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत पटेल यांचे नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून घेतले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू होती. पटेल यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत वादावर पडदा टाकला होता. परंतु आता स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि मंत्र्याची बैठक बोलवली होती. पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांसोबत सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच बैठक होती. याच बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली.
सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. येत्या २६ तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरुन दोन्ही राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि आमदार, खासदारांमध्ये काही प्रमाणात सुरू असलेली चर्चांवर पडदा पडणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.