श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष अतुल चोगले शिंदे सेनेत प्रवेश करणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम
अतुल चोगले हे रायगडमधील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते मानले जातात
त्यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का
सचिन कदम, रायगड
Raigad Uddhav Thackeray Leader Atul Chogale Joins Shivsena राज्यात ऑपरेशन टायगर सुरु असतानाच दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरेसेनेचे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष अतुल चोगले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. अतुल चोगले हे रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांचा पक्षांतराचा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुकीत अतुल चोगले यांनी उल्लेखनीय विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जितेंद्र सातनाक यांचा पराभव करून नगराध्यक्षपद पटकावले होते. हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला होता.
विशेष म्हणजे हा मतदारसंघ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रभावक्षेत्रातील असल्याने चोगले यांच्या विजयाची राज्यभर चर्चा झाली होती. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनीही चोगले यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर स्थानिक राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. आता त्यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे त्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.
राज्यातील शिवसेनेतील फूटीनंतर अनेक नेते शिंदे गटात दाखल झाले. अशा परिस्थितीत रायगडमधील श्रीवर्धनसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ठाकरे गटाच्या नगराध्यक्षाचा पक्षप्रवेश हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.