
महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरु आहे तो अत्यंत वाईट आहे. संतोष देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजापाचे काही नेतेच फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत, असे सडेतोड उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, औरंगजेबावर बोलल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पोटदुखी का झाली. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला नाही, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरला नाही तरीही भाजपाचे नेते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. औरंगजेब व फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली तर भाजपाचे नेते फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली असा कांगावा करत देवेंद्र फडणवीस यांनाच औरंगजेब ठरवत आहेत. काल रत्नागिरीत आणि त्यापूर्वी ९ मार्च रोजी बीड जिल्ह्यात सद्भावना यात्रेदरम्यानही मी हेच विधान केले होते असेही सपकाळ म्हणाले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली तर मराठी अस्मितेला ठेच कशी पोहचते ते बावनकुळेंनी सांगावे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान केल्यानंतर मराठी अस्मितेला ठेच पोहचत नाही का, कोरटकर, सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्यावर बावनकुळे का बोलत नाहीत.
काँग्रेस पक्षाला संस्कृती आहे. मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख हा भाजपाचा बुथ प्रमुख होता पण त्यांच्या हत्येनंतर भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी सुद्धा गेले नाहीत, उलट त्यांनी मांडवली करण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष म्हणून देशमुख कुटुंबांचे सांत्वन करून तेथून सद्भावना यात्रा काढली. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे पण बावनकुळे, नारायण राणे यांनी मात्र माझ्यावर पातळी सोडून टीका केली आहे, यातून भाजपाचा खरा चेहरा पुढे आला आहे.
औरंगजेब हा क्रूर शासक होता यात दुमत नाही पण याच क्रूरकर्मा औरंजेबाला मराठी मातीत गाढले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व इतिहास आहे. हा इतिहास व महाराजांचे शौर्य पुसण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. औरंगजेब जेवढा क्रूर होता तसेच ब्रिटीश होते मग ब्रिटीश सरकारला मदत करणाऱ्या संस्था, संघटना व नेते यांची स्मारके, पुतळे आणि संस्था उखडून टाकण्याचे धाडस बजरंग दल व विश्व हिंदू परिषद करणार का? असा प्रश्न काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.