महायुती अधिक बळकट करण्यासाठी भाजपनं अजित पवारांसोबत घरोबा केला खरा मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप भाजपनं केले होते. मात्र आता त्याच नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ भाजपवर आलीय. यामुळे भाजपची नेमकी कशी डोकेदुखी वाढणार आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
राजकारणात कोणीच कोणाचं कायमचं शत्रु नसतं आणि मित्रही. हीच प्रचिती भाजपच्या बदलेल्या राजकारणाकडे पाहून येते...कधी काळी विरोधात असलेल्या भाजपनं सत्ताधाऱ्यांवर केलेले हे गंभीर आरोप...भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी तर कधी विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीसांनी बेंबीच्या देठापासून ओरडत अजित पवार, नवाब मलिक, अशोक चव्हाण, छगन भुजबळ आणि शिवेसेनेचे नेते संजय राठोडांवर आरोपांची राळ उठवली होती. त्यामुळे काही नेत्यांना जेलवारी घडली होती. भाजपनं या नेत्यांवर नेमके काय आरोप केले होते पाहूया.
नाव - अजित पवार
भाजपचा आरोप - सिंचन प्रकल्पांत 70 हजार कोटींचा घोटाळा
नाव - अशोक चव्हाण
भाजपचा आरोप - कारगिल युद्धातील विधवांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटीतील फ्लॅट चव्हाणांच्या नातेवाईकांना
नाव - नवाब मलिक
भाजपचा आरोप - मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून मलिकांची जमीन खरेदी
नाव - छगन भुजबळ
भाजपचा आरोप - 2012 मध्ये महाराष्ट्र सदन बांधकामात आर्थिक घोटाळा. शेल कंपन्यांच्या माध्यमातून 850 कोटींचा घोटाळा
नाव - संजय राठोड
भाजपचा आरोप - पूजा चव्हाण या तरूणीच्या संशयास्पद मृत्यू. राठोडांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
विरोधी पक्षांमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजप करतं. त्या आरोपांनंतर केंद्रीय संस्थांकडून चौकशी केली जाते. या काळात त्या नेत्यांवर भाजपात येण्यासाठी दबाव टाकला जातो, असा आरोप काँग्रेससह देशभरातील सर्वच विरोधी पक्ष सातत्यानं करतात. दुसरीकडे भाजपनं आरोप केलेल्या या नेत्यांचं आज राजकीय पुनर्वसन झालं ते भाजपमुळेच.
राजकीय वनवासातून पुन्हा सत्तेत !
अजित पवारांसोबत भाजपनं घरोबा केला ते उपमुख्यमंत्री आहेत. अशोक चव्हाणांनी थेट भाजपत प्रवेश केला त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली. छगन भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. संजय राठोड जलसंधारण मंत्री आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांआधी राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. त्याच्या केंद्रस्थानी भाजपच होती. दुसरीकडे अजित पवारांच्या प्रवेशानं भाजपला स्वकीयांनीच लक्ष्य केलं. आगामी विधानसभेतही त्याचे पडसाद उमटणार का आणि आरोपांनी बरबटलेल्या नेत्यांच्या सत्तेतील सहभागानं भाजपचीच डोकेदुखी आणखी वाढणार का हेच पाहायचं
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.