मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राज्यभरात फिरुन राज्य सरकारच्या योजनांचा जोरदार प्रचार करत असताना स्थानिक पातळीवर मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. कारण, महायुतीमधील पक्षांचे काही नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
जनसन्मान यात्रेवेळी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यावर संतापलेल्या अमोल मिटकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या कृतीवरुन थेट देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला होता. यावर पुण्यातील भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
जगदीश मुळीक यांनी शेलक्या शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांना लक्ष्य केले. अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवल्याच्या कृतीबद्दल ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीरपणे खुलासा मागितला होता. यावर जगदीश मुळीक यांनी प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांना चांगलेच खडसावले. 'ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारू विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार.', अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली. यावर आता अजितदादा गट आणि अमोल मिटकरी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
अमोल मिटकरी यांनी रविवारी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत भाजपवर टीका केली होती. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा.', असे म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपसोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.