लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जातील अशी चर्चा होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरक्षेचे कारण देत जम्मू-कश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांमधील निवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका दिवाळीनंतरच घेतल्या जाईल, असं आयोगाने स्पष्ट केलं.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. "महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही दोन राज्ये वगळून जम्मू-कश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करून आजचे मरण उद्यावर ढकलले आहे", अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.
"देशभरात कुठे ना कुठे नेहमीच सण आणि उत्सव सुरूच असतात. प्रत्येक राज्याची एक संस्कृती आहे. त्यामुळे सणांचा विचार करून निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असेल तर मोदींचे ‘एक देश एक निवडणूक’चे स्वप्न कसे साकार होणार?" असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगाला विचारण्यात आला.
"गणेशोत्सव, पितृपक्ष, दिवाळी या सणांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका लांबणीवर टाकून निवडणूक आयोगाने आपले हसे करून घेतले. महाराष्ट्रात कुणाला तरी मदत व्हावी व आर्थिक उलाढाली करण्यास वेळ मिळावा यासाठी निवडणुकांची तारीख लांबवली याबाबत शंका नाही", अशी टीकाही सामनातून निवडणूक आयोगावर करण्यात आली.
"कश्मीरमधील संवेदनशील स्थिती पाहता प्रचार भयमुक्त असावा याची काळजी निवडणूक आयोग घेईल. प्रत्येक उमेदवाराला सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले, पण ज्या राज्यात ‘पुलवामा’सारखे भयंकर हत्याकांड घडवून एकाच वेळी चाळीस जवानांचे प्राण घेतले जातात तेथे तुमच्या तकलादू सुरक्षा व्यवस्थेला विचारतोय कोण?" असा घणाघात देखील सामना अग्रलेखातून करण्यात आला.
"जो निवडणूक आयोग स्वतःच भयग्रस्त व राजकीय दबावाखाली गुदमरून काम करत आहे त्याने भयमुक्तीवर तारे तोडावेत हे न पटणारे आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही दोन राज्ये वगळून जम्मू-कश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करून आजचे मरण उद्यावर ढकलले आहे आणि हे ‘एक देश एक निवडणूक’ घ्यायला निघाले आहेत", असंही सामनात अग्रलेखातून म्हटलंय
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.