'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटदरम्यान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, सांगलीत जोरदार सरी, सिंधुदुर्गात पावसाचा शिडकावा, तर मालेगावमध्ये उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळला आहे. पाहा जिल्हानिहाय पावसाची स्थिती आणि ताज्या अपडेट्स.
October Rain in Maharashtra
October Rain in Maharashtrasaam tv
Published On: 

राज्यातील विविध भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर जिल्हयात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, तर सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्हयात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दुसरीकडे नाशिकच्या मालेगावमध्ये झालेल्या पावसामुळे उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या पावसामुळे काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे.

कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे. अशातच पावसाला सुरुवात झाल्याने मंदिर परिसरात भाविकांची पावसापासून बचाव करण्यासाठी धावपळ उडाली. अनेक भाविकांनी परिसरातील छोट्या दुकानांचा तसेच लहान मंदिरांचा आसरा घेतला.

October Rain in Maharashtra
राजकारणात मोठा भूकंप! आणखी एक पक्ष फुटला; 8 आमदार भाजपमध्ये

सांगली जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी

सांगली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. कडेगाव आणि तासगाव तालुक्यांतील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे आणि रायबाग, तसेच तासगाव तालुक्यातील बलगवडे, कवठेमहांकाळ आणि डफळापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. दुष्काळी परिस्थितीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण; मोठ्या पावसाची प्रतीक्षा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामानात बदल झाला असून, बहुतांश भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सावंतवाडी आणि कुडाळच्या काही भागांत पावसाचा शिडकाव झाला. सावंतवाडीत पहाटेच्या सुमारास ढगांचा गडगडाटही ऐकू आला. आकाशात ढगांची गर्दी झाली असली, तरी अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर महिन्यातील बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यात पाऊस पडणार का, याकडे नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतीचे भवितव्यही आगामी पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. तर वेंगुर्ल्यामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून मोचेमाड या गावात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

October Rain in Maharashtra
राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

मालेगावमध्ये पावसामुळे उकाड्यापासून दिलासा

नाशिकच्या मालेगावसह परिसरात आज पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके करपली, तर काही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा परिस्थितीत झालेल्या पावसामुळे कोरड्या जमिनीला ओलावा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पावसाच्या सरींनंतर मातीचा सुगंध दरवळला आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांसह पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com