

सरकारच्या लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचे बदल
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
आता महाडीबीटी 2.0 पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार
राज्यातील महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या लोकप्रिय योजनेच्या नियमात बदल करण्यात आलाय. याबाबतची माहिती खुद्द महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी दिलीय.ही योजना आहे लेक लाडकी योजना.
लेक लाडकी योजनेअंतर्गत आजपर्यंत पहिला लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2,98,695 इतकी आहे. या योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी 2.0 पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करून अर्ज नोंदणी ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिलीय.
याआधी लेक लाडकी योजनेसाठी अर्जदारांना आपल्या गावातील अंगणवाडी केंद्रात भेट देऊन अर्ज जमा करावा लागत होता. त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्रित करून तत्कालीन पोर्टलवर त्यांची नोंदणी केली जात असायची. पुढे अर्जांची छाननी करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. तसेच अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जाणे अनिवार्य होते. परंतु आता शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाबाबतच्या सूचनांच्या अनुषंगाने लेक लाडकी योजनेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आलीय.
यासाठी नवीन शासन प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) तयार करण्यात आलाय. त्याअंतर्गत अर्जदारांना स्वतः ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. याससह अर्ज नोंदणी, छाननी, अर्ज मंजुरी आणि लाभ मंजुरी या प्रक्रियांमध्ये सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सादर करावयाच्या कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आलीय. या नवीन व्यवस्थेमुळे ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित नाही, अशा भागांतील लाभार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणी येणार नाहीत.
राज्यातील कोणत्याही क्षेत्रातील रहिवाशांना आता या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासह अर्जदारांना त्यांनी सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीय. लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. आता अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाइन करण्यात आल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.