Latur sangli Accident News : सोमवारी रात्री मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातामुळे सहा जणांचा मृत्यू घडल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रात तीन मोठे अपघात झाल्याचं समोर आलेय. लातूर, सांगली आणि बुलढाण्यात अपघात झालाय. लातूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर सांगलीमध्ये अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. बुलढाण्यात एसटी बस नाल्यात घसरल्यामुळे २६ जखमी झाले आहेत.
लातूरमध्ये भीषण अपघात दोन ठार -
बीड - लातूर महामार्गावरील अंबाजोगाईच्या वाघाळा पाटीजवळ ट्रक- कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर कार मधील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. आज सकाळी हा भीषण अपघात झालाय. मयत आणि जखमी हे लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे..
मिळालेल्या माहितीवरून, बीडहून सदरील ट्रक हा लातूरच्या दिशेने जात होता, तर लातूरच्या दिशेकडून स्विफ्ट डिझायर कार ही बीडच्या दिशेने होती. या दरम्यान अंबाजोगाई परिसरातील वाघाळा पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान या घटनेने बीड - लातूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सांगलीत भीषण अपघातात, एक महिला ठार तर तीन जखमी.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीहून सोलापूरला अमोल वाडकर हे नातेवाईकांसह निघाले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ अचानक त्यांच्या मोटारीचा टायर फुटला. त्यामुळे वेगात असलेली मोटार कोलांट्या घेत सुमारे पाचशे फुटापर्यंत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. या अपघातात सुनीता कल्याणी यांच्या डोक्यास मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर मोटारीतील सुशिला वाडकर, अमोल वाडकर, नीमा पोगले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बुलढाण्यात एसटी बसचा अपघात, २६ प्रवाशी जखमी
भरधाव एसटी बसचा भीषण अपघात झालाय. स्टेरिंगचं रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात घसरल्याने झालेल्या अपघातात बसमधील जवळपास २६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन प्रवाशांना मेहकर येथे तर सात जणांना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मलकापूर पांगरा ते वाघाळा रस्त्यावर हा अपघात घडला आहे. अपघात झाला त्याच्या काही अंतरावरच भलीमोठी विहीर होती, परंतु बस नाल्यामध्ये अडकल्याने सुदैवाने मोठी घटना टळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.