लातूरमध्ये किडनी काढण्याच्या आरोपावरून मोठा वाद निर्माण
रुग्णाने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली
डॉक्टरांनी आरोप फेटाळून परवानगी घेतल्याचा दावा केला
आयएमए आणि संघटनांच्या पत्रकार परिषदेत शब्दयुद्ध
लातूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक गंभीर चर्चा रंगत होती. संदेशांच्या माध्यमातून असा दावा केला जात होता की मुतखड्याचे ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या एका रुग्णाची डॉक्टरांनी परस्पर किडनी काढली. या चर्चेला उधाण आले असताना कोणते हॉस्पिटल, कोण डॉक्टर आणि कोण रुग्ण याबाबत स्पष्ट माहिती समोर येत नव्हती. शेवटी ६५ वर्षीय छमन चाँदसाब पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात गेलो होतो, मात्र डॉक्टरांनी माझी परस्पर किडनी काढून घेतली. आपली व्यथा मांडताना त्यांनी न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या पत्रकार परिषदेनंतर काही तासांतच परिस्थितीने वेगळ वळण घेतले.
आयएमएच्या पुढाकारातून दुसरी पत्रकार परिषद बोलावण्यात आली, ज्यात ममता हॉस्पिटलचे डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी स्वतःवर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, किडनी काढण्याची शस्त्रक्रिया ही रुग्णाच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच करण्यात आली असून, रुग्णाने केलेले आरोप खोटे आहेत. तसेच, त्यांनी आरोप करणाऱ्या रुग्णावर आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यास मदत करणाऱ्या संघटनेवर अब्रुनुकसानीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.
आयएमएच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अनेक टोकाचे प्रश्न उपस्थित केले. मात्र अनेक प्रश्नांना थेट उत्तर न देता बगल देण्यात आली किंवा तोडकी उत्तरे देण्यात आली, ज्यामुळे उपस्थित डॉक्टरांची चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे, छमन पठाण यांनी आपल्या पत्रकार परिषदेत पोलिसांकडे केलेल्या तक्रारींची कागदपत्रे, खाजगी व शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी अहवाल, तसेच डॉक्टरांशी झालेल्या चर्चेचे दाखले सादर केले. त्यांची पत्नी या वेळी डोळ्यात पाणी आणून आपल्या पतीसाठी न्यायाची मागणी करत होत्या.
या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरली. छमन पठाण यांनी थेट संघटनेकडे जाऊन मदत मागितली होती. संघटनेचे अध्यक्ष सुनिल सौदागर यांनी सांगितले की, पिडीताला न्याय मिळावा यासाठी आम्ही केवळ मदत करत आहोत, आणि आरोप निराधार असल्याचे सिद्ध करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन तथ्य मांडले आहेत.
संघटनेचा संबंधीत डॉक्टरांशी कोणताही संपर्क झालेला नाही, तसेच पत्रकार परिषदेनंतर आम्ही पिडीत रुग्णाला घेऊन पोलिसांत औपचारिक तक्रार नोंदवणार आहोत. लातूरातील हे प्रकरण आता केवळ वैद्यकीय वादापुरते मर्यादित न राहता, डॉक्टर, संघटना आणि रुग्ण यांच्यातील शब्दयुद्धात परिवर्तित झाले आहे. पुढील काही दिवसांत पोलिस तपास आणि कायदेशीर कारवाईनंतरच या वादाचा खरा निकाल लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.