संदीप भोसले, साम टीव्ही
लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याकडून ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत सोशल ऑडिट करण्यात येत आहे. या अभियानादरम्यान लातूर जिल्ह्यातील औसा येथील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औसा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सोशल ऑडिटदरम्यान अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपण या शाळेतील नियमित विद्यार्थी नसून खासगी शाळेतील विद्यार्थी असल्याचे दिपकेंसमोर सांगितल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी संबंधित विद्यार्थी खासगी शाळेतील नसून शेजारील उर्दू शाळेतील विद्यार्थी असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. या प्रकारामुळे औसा केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थिती, शाळेतील नोंदी आणि प्रत्यक्ष वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये मोठा झोल दिसून आला.
सोशल ऑडिटदरम्यान समोर आलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून नेमके सत्य काय आहे, याची पडताळणी करण्याची मागणी होत आहे. अभिजीत दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानादरम्यान समोर आलेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी अभिजीत दिपके यांनी शाळेत गेल्यावर त्यांना मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. शाळेची पटसंख्या कमी असल्याने शिक्षकांनी थेट बाजूच्या उर्दू शाळेचे विद्यार्थी आणून बसवले होते.
तसेच विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी चकाचक नवीन प्लेट ही आणल्या. आदल्या दिवशी शाळेतील वाढलेले गवत देखील काढण्यात आले. शाळेच्या परिसरात रोजच गर्दूल्यांचा वावर असायचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नशेचे पदार्थ हे देखील असल्याने त्याचीही साफसफाई करण्यात आली. मात्र दिपके यांच्या हे सगळे लक्षात आल्यावर त्यांनी शाळा व्यवस्थापनेला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.