लाडक्या बहिणींना १४ जानेवारीला ३००० रुपये मिळणार
पुण्यात व्हायरल होत आहे मेसेज
काँग्रेसकडून राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
राज्यामध्ये २९ महानगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार करण्यात गुंतले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांकडून घोषणांसह आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील लाडक्या बहिणी डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी येणार याची वाट पाहत आहेत. अशातच पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याचा हा मेसेज व्हायरल होत आहे.
लाडकी बहिणींना १४ जानेवारीला ३००० रुपये मिळणार हा मेसेज व्हायरल करत महिला मतदारांना आकर्षित केले जात आहे. काँग्रेस नेते अॅड. संदेश कोंडविलकर यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. खरंच सरकार लाडक्या बहिणींना मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे देणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थिती केला. याबाबत काँग्रेसने केलेल्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत याबाबतची वस्तुस्थिती काय ते स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला शनिवारी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो मेसेज व्हायरल होत आहे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवत दावा केला होता की, 'डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ असे २ महिन्यांचे ३०० रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार १४ जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. महिलांना हे एकप्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे.'
लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुण्यात जो मेसेज व्हायरल होत आहे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा अजिबात विरोध नाही आहे. दुसऱ्या दिवशी मतदान असताना १४ जानेवारीला या योजनेच्या लाभार्थीना एक नाही तर दोन महिन्यांचे पैसे सरकार देणार असेल तर तो आचारसंहितेचा भंग असेल. आयोगाने हा प्रकार रोखला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे.'
पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो मेसेज व्हायरल होत आहे त्यामध्ये असे लिहिले आहे की, 'मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची थेट भेट. ३००० हजार रुपये होणार खात्यात जमा. म्हणून आपण सगळ्यांनी प्रभाग क्र. ४० मधील लाडक्या बहिणींना कमळासमोरील बटण दाबून प्रचंड मताने निवडून द्या.' हा मेसेज कोंढव्यातील प्रभाग क्रमांक ४० मधील आहे. हा मेसेज फक्त पुण्यातच नाही तर राज्यभरातील अनेक प्रभागात व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.