
संदीप भोसले, साम टीव्ही
लातूर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रशासनाकडून लाडकी बहीण योजनेवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. राज्यातील विविध भागात बोगस कागदपत्रांच्या आधारे लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड झालं आहे. लातुरात देखील बोगस कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे. तसेच लातूरमध्ये २५ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरल्याचीही माहिती हाती आली आहे.
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे ५ लाख ९२ हजार १९ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांपैकी ५ लाख ६७ हजार महिला या योजनेसाठी पात्र झाल्या आहेत. याबरोबरच सांगलीसह लातूर जिल्ह्यात देखील अंगणवाडी कार्यकर्त्यांचे बोगस आयडी तयार करून 1171 बनावट अर्ज तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आता या बनावट अर्जांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या बोगस कागदपत्रांच्या आधारे या सरकारी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांवर आता गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं आहे.
'कोणी चुकीचे कागदपत्रे दिली असेल. ही योजना चुकीच्या पद्धतीने गेली नाही पाहिजे. योजनेचा अर्ज भरताना चुकीचे कागदपत्रे दिली असेल, तर त्यांचा अर्ज बाद होईल. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल होतील. चुकीच्या कागदपत्रांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होईल, असे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता खोटे कागदपत्रे देणाऱ्यांवर कारवाई होणार का, याच्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.