परतूरमधील धक्कादायक घटना
बेपत्ता तरुणाचा मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ आढळला
मृतदेह शवविच्छेदनासाठी घंटा गाडीतून रुग्णालयात नेण्यात आला
घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
नागरिकांमध्ये संतापाची लाट
अक्षय पाटील, जालना
जालना जिल्ह्यातील परतूर शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर तो थेट नगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या घंटा गाडीतून रुग्णालयात नेण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेकडे रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध असतानाही मृतदेह अशा प्रकारे घेऊन जाण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतूर शहरातील हिरालालनगर परिसरात राहणारा सुरेश डाकरे हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक प्रयत्न करत होते. अखेर त्याचा मृतदेह शहरातील पाण्याच्या टाकीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मृतदेह रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नगरपालिकेकडे स्वतःची रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध असतानाही मृतदेह चक्क कचरा गोळा करणाऱ्या गाडीत टाकून रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच स्थानिक आमदारांच्या हस्ते नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले होते.
तसेच नगरपालिकेकडे आणखी एक रुग्णवाहिका उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उपलब्ध सुविधा असतानाही त्यांचा वापर का करण्यात आला, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेवर सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पडेवार यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परतूर नगरपालिकेच्या (Partur Nagarpalika) प्रशासनावर आणि पोलिस यंत्रणेवर टीकेची झोड उठली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.