
संजय महाजन, साम प्रतिनिधी
जळगाव शहरातील महाबळ परिसरात हिट अँड रनची घटना घडलीय. पायी चालणाऱ्या एका महिलेला मद्यधुंद कार चालकाने उडवलं. कारची धडक लागल्यानंतर महिला १५ ते २० फूट दूर फेकल्या गेली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय. याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत पावलेली महिला शहरातील महाबळ परिसरात राहत होत्या. वंदना सुनील गुजराथी असं या महिलेचं नाव आहे. वंदना गुजराथी ह्या रात्री रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी शहराकडून येणाऱ्या भरधाव कारनं त्यांना धडक दिली. कार चालवणारा चालक हा मद्यधुंद होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाने वंदना गुजराथी यांना जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भयानक होता की वंदना गुजराथी ह्या १५ ते २० फूट फेकल्या गेल्या. धडक देऊन कार भरधाव वेगाने पुढे गेली. त्या चारचाकीने आणखी दोघांना धडक दिली. त्यानंतर मद्यधुंद चालकाने वाघनगर परिसरातील काही घरांच्या बाहेरील कुंडी आणि बाकदेखील उडवलं.
कार चालक वाहन घेऊन फरार होण्याच्या बेतात होता, परंतु एका ठिकाणी असलेल्या चिखलात वाहन फसले. काही केलं तरी वाहन निघत नसल्याचं पाहून चालकाने कार तेथेच सोडून त्याने घर गाठले. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर आणि तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रामानंद नगर पोलिसांनी मद्यधुंद वाहन चालक मोंटू सैनी यास ताब्यात घेतलं आहे. जखमी वंदना गुजराथी यांना काही नागरिकांनी लागलीच खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरुवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महाबळ ते वाघनगर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात उतार आहे. या ठिकाणी नेहमी अपघात होत असतात. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना लगाम घालण्यासाठी त्याठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहे. संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.