आज देशातील १७ राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी
IMD नुसार पुढील ८ तास महत्त्वाचे
पावसासोबत ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना अलर्ट
देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, ओडिशा आणि तमिळनाडूसह अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज देशातील अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील ८ तास महत्त्वाचे असल्याचे IMD ने जारी केले आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबईसह अनेक भागात सकाळ पासून पावसाची रिमझिम पाहायला मिळाली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, सिक्कीम, छत्तीसगड, तमिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, मणिपूर, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज असून, यावेळी ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही महाराष्ट्रातील हवामानात बदल कायम आहे. वातावरणातील बदलांमुळे मध्य महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, आज काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. दरम्यान, उत्तर छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तसेच विदर्भापासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणमार्गे अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. दुसरीकडे, दक्षिण अंदमान समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढून डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही हवामान प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.