सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यव्यापी धडक मोहीम उघडली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात विशेष तपासणी मोहिमेत तब्बल ३ कोटी ११ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३२,०६१ लिटर खाद्यतेल आणि ३७,१२८ किलो इतर संशयित व असुरक्षित अन्नसाठ्याचा समावेश आहे.
भिवंडीतील एका संकुलात FDA ने मोठी कारवाई करत ऑलिव्ह ऑइलच्या नावा Jivo ब्रँडचे Pomace Olive Oil तपासले. ते ऑलिव्ह ऑइल नसून पूर्णतः शेंगदाणा तेल असल्याचे प्रयोगशाळेत निष्पन्न झाले. ग्राहकांची होणारी ही फसवणूक रोखण्यासाठी ११,७७९ लिटर खाद्यतेल आणि २,८५० किलो चहा असा एकूण १ कोटी २७ लाखांपेक्षा अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
धाराशिव, परभणी आणि जालना या जिल्ह्यांत व्यापक तपासणी करण्यात आली. परभणीतील जिंतूर व इतर परिसरांसह धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खवा, पेढे, कलाकंद, तूप, शेव-फरसाण मिश्रण असा सुमारे ३३,९४० किलो (किंमत ८७.५२ लाख रुपये) साठा जप्त करण्यात आला. तसेच जालना येथे प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडण्यात आला असून, वाहनासह ९३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुण्यातील बावधन, कसबा पेठ, बिबवेवाडी आणि पौड रोड भागात केलेल्या कारवाईत अनियंत्रित तापमानात साठवणूक केलेले ९,००० किलो पनीर, ४४० किलो खवा आणि ९,८८८ लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले. हे पदार्थ मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याचा संशय आहे. नागपूर व चंद्रपूर (वरोरा) येथे केलेल्या तपासणीत अस्वच्छ परिस्थितीत साठवलेले १,०७८ लिटर रिफाइंड सोयाबीन तेल आणि ४९ किलो संशयित निकृष्ट खवा असा एकूण २ लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त करण्यात आला.
कांदिवली पूर्व व पश्चिम भागात केलेल्या कारवाईत रंगाचा संशय असलेले बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, शेजवान स्टिक्स तसेच जिलेबी आणि महाराजा हलवा जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. तसेच मुंबई परिमंडळात अवैध तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला असून साकीनाका येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे केलेल्या तपासणीत सनराईज ब्रँडची ८७ किलो भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाची भगर जप्त करण्यात आली.
अस्वच्छतेमुळे ४ आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबईतील हॉटेल्स आणि खाणावळ्यांमध्ये केलेल्या तपासणीत गंभीर नियमभंग समोर आले आहेत. अस्वच्छ किचन, ड्रेनेजची समस्या, गंजलेले रॅक, शिळा पाव ताज्या पावात मिसळणे, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे आणि मिठाईमध्ये अनधिकृत खाद्यरंगांचा वापर केल्यामुळे गंभीर उल्लंघन आढळले. याप्रकरणी बोरीवलीतील 'अरबियन रॉवर्मा कॅफे', माहिम येथील 'नाथ फास्ट फूड', 'नायर ऑन फायर क्लाऊड किचन' आणि 'बिकानेर स्वीट्स अँड नमकीन' या चार प्रमुख आस्थापनांचे परवाने निलंबित करून त्यांना व्यवसाय बंदची नोटीस बजावण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.