
सागर आव्हाड, साम टीव्ही
गेल्या काही दिवसांत हवामानाचा ऊन आणि पावसाचा खेळ सुरु आहे. राज्यातील काही भागात कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. तर काही भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञांनी इशाऱ्यामुळे नागरिकांनी घेण्याची गरज आहे.
यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा कडक असू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यात महाराष्ट्राची स्थिती कशी असेल? एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात का? पावसाची स्थिती काय असेल याविषयी हवामानतज्ज्ञ एस. डी सानप यांनी महत्वाची माहिती दिली. सानप म्हणाले, 'आता सध्या कुठेही उष्णेतेच्या लाटा कुठेही दिसून आलेल्या नाहीत. उलट तापमान सरासरीपेक्षा कमी दिसून आलेलं आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे'.
'सध्यातरी कुठेही उष्णतेच्या लाटा नाहीत. येणाऱ्या दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. हवेत आद्रतेचे परिणाम वाढते. त्यावेळी ढगांची निर्मिती वाढते. तापमान वाढण्यापेक्षा सरासरीपेक्षा कमी होते. त्यानंतर येणाऱ्या एक ते दोन दिवसांत तापमानात घट पाहायला मिळण्याची शक्यता आहे, असे ते पुढे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी गाराही पडल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हलका स्वरुपाचा पाऊस सुरू होता. मात्र आज सायंकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केशर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याला या पावसाचा मोठा फटका बसत आहे. त्याशिवाय उरलीसुरलेली रब्बीची पीकही या पावसामुळे धोक्यात आली आहेत. दुसरीकडे गेल्या महिन्याभरापासून अचानक वाढलेलं तापमान या पावसामुळे कमी झाल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत आज रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. महाड आणि पोलादपूर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास बरसलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. महाड बाजारात रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. छत्री नसल्याने कामावरून परतणारे अडकून पडले होते. आजच्या पावसाने आंबा, काजू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वीटभट्टी व्यवसायाला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील 4 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.