सोलापूर : श्री स्वामी समर्थांनाच गुरु मानणारे असंख्य स्वामी भक्त देशभरात असल्याने अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील महतीमुळे श्रीगुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दि.२५ मार्च रोजी स्वामींचे वटवृक्ष मंदीर पुन्हा बंद करण्यात आले होते. ते आज तागायत बंदच आहे. मंदिरातील स्वामींचे नित्योपचार, नित्यक्रम, पूजाअर्चा, धार्मिक विधी हे नियमितपणे चालू आहेत.
कोरोना पार्श्वभुमीवर आज वटवृक्ष मंदिरातील श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने भाविकांविना साजरा करण्यात आला. गुरूपौर्णिमेनिमित्त आज पहाटे पाच वाजता स्वामींची काकड आरती पुरोहित मोहन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पार पडली. सकाळी ११ वाजता गुरुपौर्णिमेची महानैवेद्य आरती मंदिर पुजारी यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
याप्रसंगी सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी कोणत्याही भाविकांना थेट आरती दरम्यान सहभागी होता आले नाही. आरतीनंतर मंदीर बंद करून गाभारा मंडपाचे प्रवेशद्वार त्वरित बंद करण्यात आले. स्वामी भक्तांनी देखील गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही घरीच थांबून स्वामींची आराधना करावी असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.