Guhagar Beach, Ladghar Beach, Shrivardhan Beach : महाराष्ट्राच्या शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने २०२६-२७ या हंगामासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर केला आहे. या यशामुळे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत प्रथमच स्थान मिळवले आहे.
पर्यावरण संवर्धन, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, जैवविविधतेचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता, आवश्यक पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता केल्याबद्दल या समुद्रकिनाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
या महत्त्वपूर्ण यशामागे राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, पर्यटन विभाग, संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, बीच मॅनेजमेंट कमिटी तसेच स्थानिक नागरिक आणि विविध यंत्रणांचे समन्वित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला असून, महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील इतर पात्र समुद्रकिनाऱ्यांचाही आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्यासाठी ब्ल्यू फ्लॅग कार्यक्रमाचा उपयोग करण्यात येणार आहे. यामुळे किनारपट्टीवरील पर्यावरण संरक्षणासोबतच स्थानिक रोजगार, पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.
नव्याने पुरस्कारप्राप्त या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांचा ब्ल्यू फ्लॅग हंगाम १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या पुरस्काराचे प्रतीक असलेले प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग नेदरलँड्स येथून प्राप्त होत असून, ते राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.
देशात २०२६-२७ हंगामासाठी एकूण २२ समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मान्यता मिळाली असून, त्यामध्ये १३ समुद्रकिनाऱ्यांचे नूतनीकरण आणि ९ नवीन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांचा या नव्या यादीत समावेश होणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.
स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही चालना - पंकजा मुंडे
“महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार मिळणे, ही राज्याच्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेली जागतिक पातळीवरील पावती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्यासाठी कटिबद्ध आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळेल, तसेच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. भविष्यात राज्यातील अन्य पात्र समुद्रकिनाऱ्यांचाही आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करून महाराष्ट्राला शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचे अग्रगण्य केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.