Gondia Balaghat road accident kills six labourers : रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मजुरांवर वाटेतच काळाने घाला घातल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की पिकअपचा चेंदामेंदा झाला. या अपघातामध्ये ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पिकअपचा झाला चेंदामेंदा
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व मजूर हे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कामानिमित्ताने हे सर्वजण पिकअप वाहनाने हैदराबादच्या दिशेने निघाले होते. नागरा परिसरात रात्रीच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की वाहनात बसलेले मजूर आतच अडकून पडले आणि ६ जणांचा तडफडून जागीच मृत्यू झाला.
स्थानिक आणि पोलिसांची मदतीसाठी धाव
अपघाताचा भीषण आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पिकअपमध्ये अडकलेल्या जखमींना आणि मृतदेहांना मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
मध्य प्रदेशातील कुटुंबांवर शोककळा
कामावर जाण्यापूर्वीच मध्य प्रदेशातील या ६ मजुरांचा दुर्दैवी अंत झाल्याची बातमी समजताच त्यांच्या मूळ गावी आणि कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून, अपघात नेमका कसा घडला याचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.