
गणेश उत्सवात म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना गोकुळकडून खास भेट
गोकुळची म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ
म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढविण्यास प्रोत्साहन मिळावा यासाठी गोकुळचा निर्णय
रणजित माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
Gokul Milk News : गणेश उत्सवात दूध उत्पादकांना गोकुळकडून खास भेट देण्यात आली आहे. गोकुळची म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लीटर एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढवण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी गोकुळने मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
१ सप्टेंबर २०२५ पासून खरेदी दरात वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना दर महिन्याला साडेचार ते पाच कोटींचा ज्यादा दर मिळणार आहे. पण गोकुळच्या दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गोकुळच्या दूध खरेदी दराबाबच्या निर्णयाची माहिती गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांनी दिली आहे.
१. म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ -
दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने संघाशी संलग्न म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर १ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दि.०१/०९/२०२५ इ. रोजी पासून जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५०.५० वरून रूपये ५१.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५४.८० वरून रूपये ५५.८० करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३२.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे. या दर वाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी जवळ-जवळ साडे चार ते पाच कोटीचा जादाचा दर मिळणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही.
२. संस्था इमारत अनुदान वाढ -
प्राथमिक दूध संस्था संघाचा आधारभूत घटक असून सध्या इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य दर आणि मजुरांचे पगार वाढलेले आहेत व सध्याच्या महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधणेसाठी किंवा खरेदी करणेसाठी आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने सध्याच्या देणेत येणाऱ्या अनुदानामध्ये
वाढ करणेत यावी अशी संस्थांच्याकडून वारंवार मागणी होत होती. यानुसार दूध संस्थेच्या संकलनानुसार अनुदानात रक्कमेत ८ ते १० हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३. दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ -
संस्था कर्मचारी हे दूध उत्पादक व संस्था यांच्यामध्ये दुवा असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्याच्या पगारासाठी प्रोत्साहनपर जादा दर प्रतिलिटर ५ पैशाची वाढ करण्यात येणार असून ती प्रतिलिटर ०.६५ पैसे ऐवजी ०.७० पैसे करण्यात आली आहे. याचा जवळ-जवळ ३ कोटी रुपये वार्षिक आर्थिक भार संघावरती पडणार आहे.
४. मुक्त गोठा अनुदान योजना सुधारणा -
गोकुळ दूध संघाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मुक्त गोठा अनुदान योजनेत यापूर्वी किमान ५ जनावरांपर्यंत असणाऱ्या गोठ्यांनाच अनुदान दिले जात होते. ती अट शिथिल करून लहान दूध उत्पादकांनाही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून किमान ५ ऐवजी ४ जनावरे असलेल्या मुक्त गोठ्याला अनुदान दिले जाणार आहे.
गोकुळ दूध संघाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. "गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
तसेच दि. १ सप्टेंबर २०२५ पासून या सर्व योजना लागू होतील. यासंदर्भातील अंतिम मान्यता गोकुळ संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत घेण्यात येईल. या सर्व योजनेची सविस्तर माहिती व सुधारित परिपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना लवकरच पाठविण्यात येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.