गणेश शिंगाडे, साम टीव्ही
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. माओवादविरोधी अभियानांतर्गत पोलिसांना सातत्याने यश मिळत असून, माओवाद्यांचे नेटवर्क कमकुवत करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा माचुवंचा येथील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ऑक्टोबर रोजी पहाटे विशेष अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत C-60 पथकाच्या चार तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाचा (BDDS) सहभाग होता.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 12 क्लेमोर, एक बारा बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, एक एअर गन, जिवंत क्लेमोर, बॉटल स्फोटके, वायरलेस माईक सेट, 100 सुतळी बॉम्ब आणि माओवादी गणवेशासाठी वापरले जाणारे कापड असा मोठा साठा जप्त केला. यामध्ये एकूण पाच अग्निशस्त्रांचा समावेश आहे. तसेच दोन स्फोटके आणि इतर साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
ही विशेष मोहीम अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज, हर्षवर्धन बी. जे. आणि उपअधीक्षक सुनील उईके यांच्या देखरेखीखाली पार पडली. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पोलिसांकडून माओवाद्यांविरोधात सातत्याने अभियान राबवले जात आहे. शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त करण्याच्या या कारवाईमुळे माओवाद्यांच्या हालचालींना आळा घालण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.