सचिन बनसोडे, साम टीव्ही
आज फादर्स डे.. एक बाप आपल्या लेकरांसाठी जिवाची पर्वा न करता, कसा संकटांना भिडतो याचे ज्वलंत उदाहरण अहिल्यानगर जिह्यात बघायला मिळाले. अकोले तालुक्यातील डोंगरगावमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी एका पित्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी दोन हात केले. मात्र, मुलीची सुटका केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी धावत असताना बाप-लेक दोघेही अंधारात खोल विहिरीत कोसळले. या थरारक घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील मनोज गुंजाळ यांच्या चार वर्षीय मुलीवर, घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. आईच्या पाठीवर असलेल्या अवनीला बिबट्याने तोंडात पकडून अंधाराच्या दिशेने ओढत नेण्यास सुरुवात केली. मुलीचा आक्रोश आणि आईचा आरडाओरडा ऐकताच वडील मनोज गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनोज गुंजाळ यांनी बिबट्याशी झुंज देत अवनीची सुटका केली.
मात्र त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन घराच्या दिशेने धावत असताना अंधारामुळे समोरील विहीर दिसली नाही आणि बाप-लेक दोघेही खोल विहिरीत कोसळले. ग्रामस्थांनी धाव घेत दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. बाप आणि लेकीवर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, बापाने आपल्या लेकीसाठी थेट बिबट्याशी दोन हात करत दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.