

पुणे -बंगळुरू महामार्गावरील शेतकरी आंदोलनाचा आज तिसरा दिवस
ऊसाला ४५०० रुपये पहिली उचल देण्याची शेतकऱ्यांची मागणी
शेतकरी आंदोलनामुळे एसटीच्या १६६ फेऱ्या रद्द
गोकुळ दूध विक्रीवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम
ऊस दरवाढीसाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतूक रोखली आहे. शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. ऊसाला ४५०० रुपयांची पहिली उचल मिळावी या प्रमुख मागितीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असली तरी या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या आंदोलनाचा फटका परिवहन विभाग आणि गोकुळच्या दूध विक्रीला बसला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाचा फटका आता एसटी महामंडळाच्या परिवहन विभागालाही बसलाय. ऐन दिवाळीच्या हंगामात कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल १६६ एसटी फेऱ्या रद्द करण्याची वेळ परिवहन विभागावर आली आहे. यामुळे एसटी महामंडळाचं जवळपास ५ कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असतानाच फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऊस दर आंदोलनाचा परिणाम आता केवळ साखर कारखाने आणि वाहतुकीपुरता मर्यादित न राहता सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवरही झाला आहे.
पुणे- बंगळुरू महामार्गावर सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाचा फटका आता गोकुळ दूध संघालाही बसू लागला आहे. मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या गोकुळच्या दूध विक्रीवर तब्बल ५० टक्के परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने गोकुळचे अनेक दूध टँकर रस्त्यातच अडकून पडले आहेत. हे टँकर वाहतूक कोंडीतून बाहेर काढून मार्गस्थ करावेत, अशी मागणी गोकुळ प्रशासनाने पोलिस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, अद्यापही टँकरची वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील दूध विक्रीवर थेट परिणाम झाला आहे. आंदोलन असंच सुरू राहिल्यास मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये होणारा दूध पुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस दर आंदोलनाचा परिणाम आता दूध वितरण व्यवस्थेवरही जाणवू लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.