
योगेश काशिद, साम टीव्ही
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवनचक्की बसवण्याचं काम चालू आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवनचक्क्या बसवण्यात आल्या आहेत, त्यांना जो मोबदला दिला जातो, तो मोबदला योग्य मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पवनचक्की बसवण्याआधी एक व्यवहार ठरतो, त्यानंतर शेतकऱ्यावर दबाव आणला जातो. शेतकऱ्यांना दिलेले चेक देखील बाउन्स होत आहेत. त्यामुळे पवनचक्कीसाठी जागा दिलेले शेतकरी आता अडचणीत सापडले आहेत.
पवनचक्की कंपनीच्या वादातूनच 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा क्रूरपणे खून करण्यात आला. मात्र यावर प्रशासन अजून देखील योग्य पाऊल उचलायला तयार नाही. त्यामुळे अजून किती शेतकऱ्यांचे बळी घेणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. या प्रकरणावर शेतकरी आदम खान म्हणाले की, 'माझ्या शेतामध्ये अचानक तार ओढण्यासाठी पवनचक्की कंपनीचे लोक आले. त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. त्याचवेळी आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला कळवलं. मात्र अजूनही आम्हाला मावेजा मिळाला नाही. ते तार ओढण्यासाठी आले होते आणि आमचे मोबाईल कंपनीच्या लोकांनी आणि पोलीस प्रशासनाने हिसकावून घेतले'.
'माझ्या शेतामधून तार चालली आहे, मला मावेजा देणार म्हणून म्हणून सांगितले. मात्र मावेजा दिलेला नाही. मी याची व्हिडिओ शूटिंग काढत असताना माझा मोबाईल हिसकावून घेतला. माझ्यावर दबाव आणला जात आहे, असे शेतकरी दत्ता बळीराम गिरे म्हणाले.
'माझ्या शेतातून पवनचक्कीची तार ओढण्याचे काम चालू आहे. मला काही चेक दिले. मात्र त्यामधील काही चेक बाउन्स देखील झाले आहेत. आम्हाला पैसे देतो, असं कंपनी म्हणत आहे. मात्र अजून आम्हाला त्यातील पैसे दिलेले नाहीत. शेवटची तार ओढण्याच्या वेळेस तुमचे उर्वरित पैसे देतो, असं सांगितलं होतं. मात्र आम्हाला पैसे न देता तार ओढणी चालू आहे. एकप्रकारे आमच्यावर दबाव आणला जात आहे, असे शेतकरी विकास गिरे म्हणाले.
'बीड तालुका आणि पाटोदा तालुका या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पवनचक्की बसवण्याचे काम चालू आहे. ते अगोदर भाव वेगळा ठरवतात. त्यानंतर वेगळा दर देतात. त्यांनी अनेकांना दिलेले चेक बाउन्स झाले आहेत. अनेक ठिकाणी मावेजा न देता पवनचक्कीची तार ओढण्याचे काम चालू आहे. मात्र शेतकरी आडवा आला, तर त्याला पोलीस प्रशासन बोलावून एखाद्या आरोपी सारखं धरून घेऊन जात आहेत. यावर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला द्यावा, अशी मागणी गणेश ढवळे यांनी केली.
दरम्यान, या सर्व बाबीचा जर विचार केला तर नक्कीच शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्याला योग्य मोबदला द्यावा. जे बाउन्स झालेले चेक आहेत. ते बदलून द्यावेत आणि शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक फसवणूक टाळावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.