
मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या पूर्वसंध्येलाही महायुतीत धुसफूस यानिमित्ताने समोर आली आहे. निवडणुकीत मोठं यश मिळविल्यानंतरही महायुतीत खातेवाटपावरुन असलेला बेबनाव समोर आला आहे. पाहूया एक रिपोर्ट.
भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला.शपथविधीचा मुहूर्त ठरला. मात्र महायुतीतला गृहमंत्रिपदाचा तिढा काही सुटायला तयार नाही. गृह खातं हे सत्तेतलं दोन नंबरच पद मिळावं यासाठी एकनाथ शिंदेंनी आपला धनुष्यबाण ताणून धरलेला आहे. काही दिवसांच्या नाराजी नाट्यानंतर शिंदे मंगळवारी अॅक्शन मोडवर आले.
वर्षावर गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठकींचा सिलसिला पार पडला. मात्र शिंदे गृहमंत्रीपदासाठीचा त्यांचा हट्ट सोडायला तयार नाही. साम टीव्हीशी संवाद साधताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गृहमंत्रीपदासाठी आग्रह कायम असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे गृहमंत्रिपदाबाबत रात्रीपर्यंत निर्णय होईल, असं भाजपचे निरीक्षक विजय रूपाणी यांनी सांगितलं.
महायुतीत गृहमंत्रिपदावरुन अजूनही तिढा कायम असल्याचं उघड झालंय. मात्र एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी का अडून बसलेत त्याची काही कारणं आहेत ती पाहूयात.
मुख्यमंत्रिपदानंतर गृहखातं हे सरकारमधलं दोन नंबरचं मंत्रिपद
मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असल्यास आणि अजित पवार अर्थमंत्री झाल्यास त्यांच स्थान दोन नंबरच असणार
गृहखातं न मिळाल्यास एकनाथ शिंदे थेट 3 नंबरच्या स्थानावर जाणार
आगामी महापालिका, झेडपी निवडणुकांच्या दृष्टीनं गृह खातं शिवसेनेकडे ठेवण्याचा शिंदेंचा आग्रह
पक्षाच्या बळकटीकरणासाठी आणि मित्रपक्षांवरही वचक ठेवण्यासाठी गृहखातं गरजेचं
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फ़डणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. मात्र त्यांनी गृहखातं न सोडल्यामुळे त्यांचा दोन नंबरचा मान कायम राहिला होता. त्यामुळेच आता एकनाथ शिंदेंनाही उपमुख्यमंत्रिपदासोबत गृहखातं हवंय. मात्र भाजप ते सोडायला तयार नाही. त्यामुळे शपथविधी काही तासांवर आलेला असताना सुद्धा गृहखात्यावरून तिढा कायम आहे. आता शपथविधीआधी शिंदे गृहखात्यावरून माघार घेणार की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस गृहखातं सोडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.