धाराशिवमध्ये १३ महिन्यांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या
सख्ख्या चुलत्याला २४ तासांत अटक
शेतात गळा दाबून हत्या
कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य
आरोपीची गुन्ह्याची कबुली
Dharashiv Tuljapur 13 Month Baby Girl Murder Case धाराशिवमध्ये सख्ख्या काकाने १३ महिन्यांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या अमानुष घटनेचा उलगडा तामलवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत करत संबंधित आरोपीला अटक केली आहे. या हत्येप्रकरणानंतर गावात खळबळ उडाली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार,दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी महादेव माने (रा. गवळेवाडी) यांनी आपल्या १३ महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची तक्रार तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गु.र. नं. २९/२०२६ कलम १३७(२) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पीडित मुलीचा चुलता शंकरेश्वर माने याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने केलेल्या संतापजनक कृत्याची कबुली दिली.
आरोपीने दिलेल्या कबुली जबाबानुसार, २७ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान मुलीला घरातून उचलून नेले. शेतात नेऊन तिचा गळा दाबून हत्या केली व त्यानंतर कोयत्याने मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले. संधी मिळताच जवळील चारीमध्ये पुरून टाकल्याचे त्याने म्हटले. आरोपीच्या कबुलीजबाबानंतर दोन पंचांसमक्ष पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या भावाची पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्याच्या कारणावरून त्याच्या मनात संताप होता. तसेच पीडित मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय त्याला आल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.