
रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्रात धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरवल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा मुंबईत लवकरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेभोजन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघाचे उद्धव ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार आहेत.
दापोली विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी विजय देखील मिळवला होता. तर ठाकरे गटाच्या संजय कदम यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आता राजन साळवीनंतर आता संजय कदम हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्यानं कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.